Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Wednesday, 24 June 2020

जागतिक कोड दिन

 

जागतिक कोड दिन -२५ जून

                                                     आपल्या कृष्ण किंवा सावळ्या त्वचेवर एखादा पांढरा ठिपका उमटला, तर जीव धास्तावतो. कोड हा शब्द उच्चारायचा झाला तरी लोकांना अंगावर पांढरी पाल पडल्यासारखे वाटते.शरीरावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींना अनेकदा सामाजिक कुचंबणेला सामोरे जावे लागते. हे डाग संसर्गजन्य असतील की काय, ही निरर्थक भीती यामागे असते. तसेच अंगावर पांढरा डाग आला म्हणजे तो डाग कोडाचा (श्वेतत्वचा) असेल असेही अनेकांना वाटते. यामागोमाग येते त्वचा विद्रुप दिसण्याची भीती.
     कोड या आजाराबाबत समाजात जागृततेऐवजी गैरसमजच अधिक आहेत. कोड असणार्‍या लोकांबाबत, या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज आहेत. कोड या आजाराबाबत जागृकता  निर्माण करण्यासाठी 25 जून हा दिवस 'जागतिक कोड दिन' म्हणून साजरा केला जातो.
   मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने, आंबट किंवा पांढरे पदार्थ खाल्ल्याने कोड होतो असा समाजात गैरसमज आहे. मात्र कोणताही पदार्थ खाल्ल्याने कोड होत नाही. 
      कोड हा आजार मूळीच संसर्गजन्य नाही. संपर्काने, एकत्र राहिल्याने, जेवल्याने हा आजार पसरत नाही. कोड हा अ‍ॅटोइम्युन आजार आहे. 
   कोड या आजारामध्ये रंगपेशी नष्ट झाल्याने त्वचा रंग पांढरा होतो. त्यामुळे लॅब टेस्टच्या मदतीने त्याचा धोका ओळखणं शक्य नाही.  क्लिनिकल एक्झामिशनने कोड ओळखला जातो. तसंच कोडवर घरगुती उपाय करत राहण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सर्जिकल आणि नव्या औषधोपचारांच्या मदतीने या आजारावर परिणाम दिसू शकतो.  
     शरीरावर विविध कारणांमुळे पांढरे डाग निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकवेळेस तो कोड असेलच असे नाही. काही वेळेस कुष्ठरोग, भाजल्याच्या जखमेनंतरही त्वचेवर पांढरे डाग पडतात. 
       जर एखाद्या व्यक्तीला कोड असल्यास त्याच्या जवळच्या नात्यात म्हणजे पालकं, मुलं, भावडांमध्ये कोड पसरण्याची शक्यता 5% असते. किंवा 5 पट अधिक असते. तसेच पालकांकडून मुलांना कोड पसरण्याची शक्यता 15% असते.कोड कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र कोडच्या निम्म्या रूग्णांमध्ये तो वयाच्या 20व्या वर्षापूर्वी होतो तर 95 % लोकांमध्ये हा आजार वयाच्या चाळीशी पूर्वी विकसित व्हायला सुरूवात होते.   
                                       हे डाग लपवण्यासाठी अनेक मंडळी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात, मनात न्यूनगंड बाळगू लागतात. पण या आजारावर उपचार नक्कीच आहेत. गरज आहे मनातील भीती काढून टाकण्याची!    
                                         त्वचेवर पांढरा डाग दिसला की त्याचा संबंध कुष्ठरोगाशी लावण्याची गल्लत सर्रास केली जाते. कुष्ठरोगात त्वचेवर फिकट पांढरे डाग/ चट्टे उमटतात, परंतु त्याबरोबर रुग्णाला कुष्ठरोगाची इतर लक्षणेही दिसतात- उदा. डागांना संवेदना नसणे. त्यामुळे प्रत्येक वेळी पांढऱ्या डागांचा संबंध कुष्ठरोगाशी लावणे चुकीचे आहे. तसेच त्वचेवरील पांढरा डाग कोडाचा असेल या विचारानेही घाबरून जाणारे अनेक असतात. कुष्ठरोग आणि कोड यांचा परस्परसंबंध नाही.आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही.
रंगपेशी नष्ट होण्याची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत. अमुक एकाच कारणामुळे रंगपेशी मरतात असे सांगणे कठीण आहे. शरीरावरील पांढऱ्या डागांच्या जागेनुसार कोडाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
१. जनरलाईझ्ड- अंगावर कुठेही येऊ शकणारे कोड, यात दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर, गुडघ्यांवर समान म्हणजे सिमेट्रिकल डाग दिसू शकतात.
 २.युनिव्हर्सल– अंगावरील सर्व त्वचेवरील रंग हळूहळू निघून जातो आणि त्वचा पांढरी दिसू लागते.
३.लोकल- अंगावर एखाद्याच ठिकाणी डाग पडतो.
४.  लिप अँड टिप- ओठांवर आणि हातांच्या बोटांवर पांढरे डाग पडतात.
५. सेगमेंटल- शरीराच्या एखाद्या पट्टय़ातच पांढरे डाग पडतात पण ते अंगभर पसरत नाहीत.
पांढरे डाग रुग्णांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ लागतात. त्यासाठी कोणतेही बाह्य़ कारण लागत नाही. लहान बाळापासून अगदी वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते. पण बऱ्याच रुग्णांना आपल्या घरात कुणाला हा आजार होता का, हे सांगता येत नाही. कारण आपल्याला पांढरे डाग आहेत याची वाच्यता करणे सहसा लोक टाळतात.
कोडाच्या डागांवर अनेक उपचार आहेत. डाग येणे आणि पसरणे थांबवणे हा या उपचारांचा पहिला टप्पा असतो. तर दुसऱ्या टप्प्यात श्वेतत्वचेत पुन्हा रंग आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर वरून औषधे लावून, जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते. ‘अल्ट्राव्हायोलेट लाईट थेरपी’त विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा वापर करून डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात. लहान डागांसाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो. डागांवर वरून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वापरली जात आहे.
         लग्नाच्या वयातील रुग्णांना शरीराच्या दर्शनी भागात पांढरे डाग असतील तर रुग्ण मुळातच सामाजिक कुचंबणेला सामोरा जात असतो. त्यामुळे उपचारांच्या परिणामांसाठी महिनोंमहिने थांबण्याची अशा रुग्णांची तयारी नसते. डागांवर औषध लावणे, नंतर सूर्यप्रकाशाचा उपचार घेणे या गोष्टी नियमित करणे अनेक जणांना शिक्षण किंवा नोकरी- व्यवसायातील व्यस्ततेमुळे जमत नाही. नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डागांमध्ये हळू- हळू रंग परत येताना दिसतो, डाग वाढणेही थांबते. पण डागांमध्ये रंग येण्यासाठी किती काळ वाट पाहावी यालाही मर्यादा आहेत. उपचार घेऊनही डागांमध्ये रंग येतच नसेल तर तिथे रंगपेशी नाहीत हे स्पष्ट होते. डागांमधील रंगपेशी पूर्णपणे नष्ट झाल्या असतील तर वरून कितीही उपचार केले तरी त्या नव्याने तयार होत नसतात. अशा वेळी त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचे उपचार करता येतात. मात्र त्वचेवर डाग वाढत असतील किंवा पसरत असतील तर मात्र त्यांची वाढ थांबवल्याशिवाय त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचा पर्याय सुचवला जात नाही.  
    त्वचा रोपण या उपचारपद्धतीत रुग्णाच्या डागावरील त्वचा काढून त्या जागी शरीराच्या दुसऱ्या भागावरील त्वचा काढून लावली जाते. पण डागांवर त्वचा रोपण करण्याला मर्यादा अनेक आहेत. डाग मोठय़ा आकाराचा असेल तर तेवढय़ाच आकाराचा निरोगी त्वचेचा तुकडा काढून त्या जागी बसवावा लागतो. यात काढलेल्या निरोगी त्वचेच्या भागावरील जखमही मोठी असते. डाग सांध्यावर असेल तर त्वचा रोपण जिकिरीचे होते. हातापायाची बोटे, कोपर, गुडघा, मान या भागांची सतत हालचाल होत असल्याने या ठिकाणच्या डागांवर रोपण केलेली त्वचा हालचालीबरोबर निघून येण्याची शक्यता असते. अशा वेळी बसवलेली त्वचा हलू नये यासाठी त्यावर प्लॅस्टर घालतात. हाडे फ्रॅक्चर झाल्यावर घालतात त्याच प्रकारचे हे प्लॅस्टर असते. कमीत-कमी पंधरा दिवस हे प्लॅस्टर वागवणे कटकटीचे होऊन बसते. गळा, पोट, पाठ या भागांवर प्लॅस्टर घालणेही शक्य नसते. शरीरावरील दोन ठिकाणच्या त्वचेच्या रंगात थोडा फरक असू शकतो. त्यामुळे त्वचेचे केलेले रोपण चिकटवलेल्या पॅचसारखे दिसू शकते. चेहऱ्यासारख्या भागात त्वचेच्या रंगातील सूक्ष्म फरकही लगेच दिसून येत असल्याने अशा ठिकाणी त्वचा रोपण सहसा केले जात नाही.      
पेशी रोपण
       स्वीडनमधील डॉ. मॅटस् ओलसन या शास्त्रज्ञाने या उपचारपद्धतीचा प्रथम शोध लावला. यात रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते. पेशीरोपण शरीराच्या कोणत्याही भागात करता येते. पेशींचे रोपण त्वचेच्या आत केलेले असल्यामुळे ते टिकावे म्हणून प्लॅस्टरही घालावे लागत नाही. डागांमध्ये रंगपेशी सोडल्यानंतर त्या आपले रंग तयार करण्याचे काम करू लागतात, आणि डागाला मूळ त्वचेसारखा रंग येऊ लागतो. पण ही उपचारपद्धती काहीशी खर्चिक आहे.  तरी आशावेळी सर्वांनी घाबरुन न जाता त्याला धैर्याने सामोरे जावयास हवे.
     संकलन व शब्दांकन
श्री.नवनाथ पांडूरंग सूर्यवंशी
जि.प.प्राथमिक शाळा,हरिसन ब्रँच
कोपरगाव जि.अ.नगर.  

1 comment: